१६ जानेवारी २०२५ सेऊल : दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्रपती युन सूक योल यांना पोलिसांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. गेल्या ३ डिसेंबर रोजी देशात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी चौकशी सुरू होती.आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला संसदेने केराची टोपली दाखवली होती.अशातच पोलिसांनी योल यांच्यात घरात घुसून अटकेची कारवाई केली आहे.त्यामुळे त्यांना मोठा दणका बसला आहे.योल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहेत.
दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती युन सूक योल यांनी अचानक मार्शल लॉ अर्थात आणीबाणी लागू करण्याची घोषणा ३ डिसेंबर रोजी केली होती.मात्र,त्याच्या अवघ्या ३ तासांतच संसदेने आणीबाणीचा निर्णय बहुमताने बदलला होता.
पुढे १४ डिसेंबर रोजी संसदेत योल यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला व तो मंजूर झाल्याने त्यांना पदच्युत करण्यात आले.पुढे या प्रकरणी १४ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा योल यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागणार होते.
मात्र, ते न्यायालयापुढे आले नाही.त्यामुळे तपास संस्थांनी अखेर बुधवारी सकाळी योल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.या बरोबरच पोलिसांचा चमू त्यांच्या घरावर धडकला. घराच्या बाहेरील भागात नव्या पायऱ्या लावून पोलीस अधिकारी योल यांच्या घरात घुसले व त्यांना बेड्या ठोकल्या,अशी माहिती सूत्रांनी दिली.
आता योल यांची चौकशी करण्यासाठी तपास संस्थांना ४८ तासांत न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.पण, सध्या योल हे चौकशीचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे समजते.दरम्यान, राष्ट्रपती युन सूक योल यांच्यावरील कारवाई रोखण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी बॅरिकेड्स लावले होते.
अशातच योल समर्थकांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.योल यांच्यावरील अटकेची टांगती तलवार लक्षात घेता त्यांचे समर्थक गत रात्रीपासूनच घरापुढे जमले होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफिने योल यांना ताब्यात घेतले आहे.
दोषसिद्धीसाठी १८० दिवसांची मुदत
राष्ट्रपती युन सुक योल यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी न्यायालयाकडे १४ डिसेंबरपासून पुढे १८० दिवसांचा कालावधी आहे. दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयातील ८ पैकी ६ न्यायाधीशांनी जर योल यांच्या विरोधात कौल दिला तर ते दोषी ठरतील.पण, जर योल दोषी आढळले नाही तर त्यांच्या विरोधातील महाभियोग अवैध घोषित केला जाईल.अशा स्थितित ते पुन्हा राष्ट्रपतीपदी विराजमान होतील.
आणीबाणी लागू करणे गुन्हा नाही : योल
दक्षिण कोरियात कायद्याचे राज्य उद्ध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती युन सूक योल यांनी दिली. देशात आणीबाणी लागू करणे हा काही गुन्हा नाही. तर, राष्ट्रीय संकटाला दूर ठेवण्यासाठी तो माझा अधिकार आहे.माझ्या विरोधात फसवणूक करणारा महाभियोग आणण्यात आला.तसेच आणीबाणीला विद्रोह समजणे हे बिनबुडाचे वक्तव्ये आहे,असे ते फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हणाले.