मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ‘मोक्का’ अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या ताब्यातून तपास यंत्रणांनी तीन मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. विशेष म्हणजे, या मोबाईलमध्ये वापरलेली काही सिम कार्डे थेट अमेरिकेत रजिस्टर झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
गेल्या निवडणुकांच्या विशिष्ट काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन केले गेल्याचा संशय एसआयटीला असून, “हे फोन का करण्यात आले?”, “या संपर्कांमागची कारणे काय आहेत?” याची चौकशी सुरू आहे. कराडच्या मोबाईलमधील कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासत असताना ही माहिती पुढे आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मोक्का अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला अलीकडेच पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत एसआयटी टीम या मोबाईल सिम कार्डांशी संबंधित माहिती, विदेशी नोंदणीची कारणे व निवडणुकांदरम्यान केलेल्या फोनकॉल्सचा तपशील तपासणार आहे.
या प्रकरणात अद्याप फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याच्याशी कराडचे कोणते संबंध आहेत, तसेच दोघांमधील संपर्काची नेमकी कधी आणि कशी झाली, याचा शोध घेण्यासाठीही पोलिस कराडकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कराड आणि आंधळे यांच्या सीडीआर तपासणीचा युक्तिवाद अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर या सात दिवसांत पोलिसांनी अधिक तपास करून हत्या प्रकरणाचा सर्वंकष छडा लावण्याचा निर्धार केला आहे.