देशात लोकसंख्या नियंत्रणाबाबत नेहमीच चर्चा होते. पण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांनाच स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लढवण्याची परवानगी असेल, असे नायडू यांनी म्हटल्याने नवीन चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला सरपंच, नगरसेवक आणि महापौर बनायचे असल्यास त्याला दोनपेक्षा अधिक अपत्य असणे आवश्यक आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
लोकसंख्येतील घसरण थांबविण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालण्याची गरज चंद्राबाबू नायडू यांनी नरवरिपल्लेमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. लोकांनी अधिक अपत्य जन्माला घालावीत यासाठी आपले सरकार प्रोत्साहनाचे धोरण आणणार आहे. एक वेळ अशी होती की, ज्यावेळी अधिक अपत्य असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती.
पण आता कमी अपत्य असलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही, अशी माझी भूमिका आहे. जर दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तरच सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष व महापौरपदाची निवडणूक लढायची परवानगी असेल, असे तेलुगु देसम पक्षाचे (तेदेप) प्रमुख असलेल्या नायडू यांनी म्हटले. जुन्या पिढीतील लोक अधिक मुले जन्माला घातल होते.
तर विद्यमान पिढीने फक्त एक मूल धोरण अवलंबले आहे. शिवाय काही स्मार्ट लोक तर दुहेरी उत्पन्न आणि अपत्यच नको, अशी भूमिका घेत आहेत. आम्हाला मूल नको, मौजमस्ती करू द्या, असे त्यांचे म्हणणे असते. जर त्यांच्या आई-वडिलांनी असा विचार केला असता तर ते जगातच आले नसते, असे वक्तव्य नायडू यांनी केले.
लोकसंख्येबाबत सर्व देश ही चूक करत असून आपल्याला योग्य वेळी निर्णय घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये देखील त्यांनी लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा उपस्थित करत त्याच्या व्यवस्थापनाची गरज व्यक्त केली होती.
२०४७ सालापर्यंत आपल्याला लोकसंख्येचा लाभ मिळेल. कारण या काळात आपल्याकडे अधिक युवक असतील. परंतु जर प्रजनन दर कमी असेल तर २०४७ नंतर वृद्ध लोकांची संख्या वाढत जाईल, असा दावा त्यांनी केला होता.