Ahilyanagar News.: गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा गावरान आंब्याला म्हणावा तसा मोहोर आला नाही. सतत बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पाऊस व धुक्यामुळे मोहोर गळून गेला, तर काही ठिकाणी मोहर जागीच जळाला. त्यामुळे गावरान आंब्याची फूट कमी झाली असून, यंदा आंब्याची चवही कमी प्रमाणात मिळणार आहे.
धुक्याचा बसला फटका
डिसेंबर महिन्यात विशेषतः ढगाळ हवामान व धुके पडल्याने आंब्याचा मोहर जळून गेला. गेल्या वर्षी कडाक्याची थंडी असल्याने आंब्याला चांगला मोहोर आलेला दिसत होता, मात्र यंदा थंडीही उशिरा सुरू झाली आणि सतत ढगाळ हवामान राहिले. यामुळे आंब्याचा मोहर फुटायला उशीर झाला.
भुरी व तुडतुडीचा प्रादुर्भाव, फवारणीचे आवाहन
ढगाळ हवामानामुळे आंब्याच्या झाडांवर भुरी रोग आणि तुडतुडी यांचे प्रमाण वाढले आहे. तालुका कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे यांनी यावर औषधफवारणी करण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर योग्य फवारणी केल्यास मोहर व फळांचे संरक्षण होणार आहे.
गावरान आंब्याची चव मिळणार कमी
आंबा हा रसाळ व आंबट-गोड चवीमुळे सर्वांचा लाडका. परंतु वातावरणातील बदलांनी यंदा गावरान आंब्याच्या उत्पादनावर थेट परिणाम केला आहे. सरासरीपेक्षा कमी मोहोर आल्याने फळांची प्रमाणाबाहेर घट होण्याची शक्यता आहे. परिणामी, आंब्याच्या उपलब्धतेत घट दिसण्याची शक्यता असून, याचा परिणाम बाजारभावावरही होऊ शकतो.
शेतकऱ्यांचा हिरमोड
अवकाळी पावसाने व धुक्याने मोहर गळल्याने यंदा आमरसाची मजा कमी प्रमाणात मिळणार असल्याचे शेतकरी व्यक्त करत आहेत. गतवर्षी थंडी अधिक असल्याने मोहोर भरघोस दिसत होता, परंतु यंदा वातावरण सतत बदलत राहिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात उत्पादन मिळणार नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.
आमरसाची गोडी कमी परिमाणात
धुक्याचा फटका आणि थंडीत आलेला उशीर यामुळे आमरसाचा आनंद घेण्यासाठी या वर्षी कमी प्रमाणात आंबे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परिणामी, खवय्यांना हवे तितके आंबे आणि रसरसलेला आमरस मिळणे कठीण ठरणार आहे.