Ahilyanagar BJP :कोण होणार अहिल्यानगर भाजपचे अध्यक्ष ? ही नावे आहेत चर्चेत

Mahesh Waghmare
Published:

Ahilyanagar News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलावर भर दिला जात आहे. शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष बदलण्याची तयारी सुरू असून, या पदांसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. सत्ता स्थापनीनंतर भाजपने ‘संघटनात्मक पर्व २०२५’ हाती घेतले आहे, ज्याअंतर्गत नव्या निवडी केल्या जाणार आहेत.

पहिल्यांदाच शहर व जिल्हा पातळीवरील नियुक्तीनंतर थेट प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असल्याचे समजते. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबूत करण्यासाठी हा पाऊल उचलला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात पक्षाने विस्तार आणि संघटनात्मक मजबुतीकरणावर भर देण्याचा निर्धार केला होता.

शहर, दक्षिण-उत्तर जिल्हाध्यक्ष पदांसाठी रस्सीखेच
शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्ष पदांवर कोणाला संधी मिळणार यासाठी अनेक नावांचे उच्चार केले जात आहेत. उत्तरेच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जालिंदर वाकचौरे, नितीन दिनकर, नितीन कापसे, राजेंद्र गोंदकर यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी युवराज पोटे, मनोज कोकाटे, शामराव पिंपळे, मृत्युंजय गर्जे, बाळासाहेब महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.

अहिल्यानगर शहराध्यक्षपदासाठीही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सचिन पारखी, बाबासाहेब सानप, दामोदर बठेजा, राजेंद्र काळे, बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. एकदा शहर व जिल्हाध्यक्ष नियुक्ती पूर्ण झाली की, थेट प्रदेशाध्यक्ष पदाचा फैसला होईल, अशी चर्चा आहे.

शिर्डी अधिवेशनात ठरले नियोजन
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने शिर्डी येथे दोन दिवसीय अधिवेशन घेतले होते. या अधिवेशनात पक्ष विस्तार आणि संघटनात्मक मजबुतीकरणावर भर देण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानुसार, आता ‘संघटनात्मक पर्व २०२५’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जिल्हा, शहर, तालुका अध्यक्षांची नियुक्ती पटकन करण्यात येणार असून, १५ मार्चपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल, असे पक्षातील वरिष्ठांनी सूचित केले आहे.

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी
पुढील काळात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे भाजपला स्थानिक स्तरावरील संघटन नवे जोमाने उभे करायचे आहे. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची फळी बांधणे व सक्षम नेतृत्व आणणे हे या प्रक्रियेमागील उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe