Ahilyanagar Crime : युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Mahesh Waghmare
Published:

Ahilyanagar Crime : जुन्या भांडणाचा मनात राग धरून ८ जणांनी एका युवकास दुचाकी आडवी घालून शिवीगाळ दमदाटी करीत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिंगार परिसरात घडली.

याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय संजय हांपे (वय २९, रा. सौरभनगर, भिंगार) हा १० जानेवारीला जीममधून घरी जात असताना बाबा ग्रुपचे अध्यक्ष प्रताप सुनील भिंगारदिवे (रा.पंपिंग स्टेशन, सावतानगर, भिंगार), शुभम उर्फ गुब्या शिंदे (रा. महेशनगर, भिंगार),

करण भिंगारदिवे, प्रशांत उर्फ सोनू सुनील भिंगारदिवे, रुपेश शिंदे, अक्षय जावळे, विशाल उर्फ बजरंग ससाणे, ओमकार उर्फ भैय्या चांदणे (सर्व रा. भिंगार) यांनी मोटारसायकलने येऊन अक्षय हांपे यास शिवीगाळ करत लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत हांपे हा गंभीर जखमी झाला. त्यास घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी औषधोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

तेथे उपचार घेत असताना त्याने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी प्रताप भिंगारदिवे व त्याच्या ७ साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe