श्रीरामपूर: शहरातील वॉर्ड नं. २ मधील घासगल्ली भागात काल (शुक्रवारी) सायंकाळी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला करत चाकूने वार केले, ज्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. याशिवाय, एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
वादाचं कारण काय ?
घटनेची सुरुवात राहाता तालुक्यातील एका इस्तेमा कार्यक्रमातील वादातून झाली होती. त्या भांडणाचं तेथेच निराकरण करण्यात आलं होतं. मात्र, गैरसमज टाळण्यासाठी काल सायंकाळी वॉर्ड नं. २ मधील घासगल्ली येथे मिटवामिटवीसाठी बैठक बोलावण्यात आली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर येताच वादाला पुन्हा सुरुवात झाली, जो नंतर हाणामारीत बदलला.
जखमींची नावे
या हाणामारीत कय्युम कासम शेख, आयान जमील पठाण, आणि मोहसीन शकील शेख हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं.
हवेत गोळीबाराची भीती
घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मते, एका व्यक्तीने त्याच्या जवळील कटट्यातून हवेत गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी यास अद्याप दुजोरा दिलेला नाही. गोळीबार गावठी कट्टा किंवा छऱ्याच्या बंदुकीतून झाला का, याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचं वाहन दिसताच गटातील व्यक्ती पळून गेल्या. सध्या पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली आहेत. दोन्ही गटांतील प्रमुखांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती.
परिसरात भीतीचं वातावरण
घटनास्थळाजवळील नागरिकांमध्ये या हाणामारीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पथके तैनात केली असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.