पुणे: सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर पुणे मेट्रो प्रशासन सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे. ‘स्वर्गात’ मेट्रो स्थानकाच्या नावाने चर्चेत असलेल्या या फोटोबाबत मेट्रो प्रशासनाने आता अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे मेट्रो स्थानकावरील एका फलकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ‘SWARGET’ असा इंग्रजीतून उल्लेख असून त्याचा मराठी अनुवाद ‘स्वर्गात’ असा दाखवण्यात आला आहे. या अनुवादामुळे पुण्यामधून थेट स्वर्गात जाणारी मेट्रो अशी नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. या चुकीमुळे मेट्रो प्रशासनाची जोरदार टीका झाली असून अनेकांनी सोशल मीडियावर यावर विनोदांची मालिका सुरू केली आहे.
प्रशासनाचं स्पष्टीकरण
या प्रकरणावर पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, “हा फोटो पुणे मेट्रोशी संबंधित नाही.” प्रशासनाने स्पष्ट केलं की व्हायरल होत असलेला फोटो पुण्यातील कोणत्याही मेट्रो स्थानकाचा नाही. हा फोटो एका जुन्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) स्थानकाचा असून त्याचा मेट्रोशी काहीही संबंध नाही.
फोटोचा संदर्भ आणि पडताळणी
मेट्रो प्रशासनाने सांगितलं की, स्वारगेट मेट्रो स्थानकाचा रूट अद्याप सुरू झालेला नाही. तसेच हा व्हायरल फोटो 2016 सालापासून इंटरनेटवर दिसत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. त्यामुळे सोशल मीडियावरील हा दावा पूर्णतः खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मेट्रो प्रशासनाचं आवाहन
पुणे मेट्रो प्रशासनाने जनतेला विनंती केली आहे की, “सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नये.” प्रशासनाने ट्वीट करत ही चुकीची माहिती थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय
सोशल मीडियावर हा फोटो आणि त्यावरून सुरू असलेले विनोद अजूनही चर्चेत आहेत. ‘पुण्याची मेट्रो आता स्वर्गात पोहोचली का?’ असे प्रश्न विचारले जात आहेत. पण, प्रशासनाने केलेल्या स्पष्टीकरणामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.