शेअर बाजारात तेजी कायम ! सेन्सेक्स ४५४ अंकांनी वाढला निफ्टी २३,३०० अंकाच्या पार

Sushant Kulkarni
Published:

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक शेअर बाजारात सोमवारी तेजी कायम राहिली आणि सेन्सेक्स ४५४ अंकांनी वधारला,तर निफ्टी २३,३०० अंकाच्या वर बंद झाला.जागतिक स्तरावर मजबूत ट्रेंड दरम्यान बँक समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार प्रामुख्याने आघाडीवर होता.३० समभागांवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स ४५४.११ अंकांनी उसळी घेत ७७,०७३.४४ अंकावर बंद झाला.व्यापारादरम्यान तो ६९९.६१ अंकांवर चढला होता.निफ्टीही १४१.५५ अंकांनी वाढून २३,३४४.७५ अंकावर बंद झाला.

सेन्सेक्स समुहातील समभागांमध्ये कोटक महिंद्रा बँकेत नऊ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा १० टक्क्यांनी वाढून ४,७०१ कोटी रुपयांवर पोहोचल्याची नोंद झाल्यानंतर बँकेच्या समभागांनी उसळी घेतली.याशिवाय बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा आणि एशियन पेंट्सचे समभागही मोठे वधारले.

दुसरीकडे, झोमॅटोला सर्वाधिक ३.१४ टक्के नुकसान सहन करावे लागले.अपेक्षेपेक्षा कमी तिमाही निकालांमुळे,त्याच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. या शिवाय अदाणी पोर्टस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती आणि टाटा मोटर्सचे समभागही घसरणीसह बंद झाले.आशियातील इतर बाजारांतील सकारात्मक भावनांनी देशांतर्गत बाजारांना आधार दिला आणि आठवड्याची सुरुवात वाढीसह झाली.

बँका आणि वित्तीय क्षेत्राच्या चांगल्या निकालांमुळे सर्वांगीण तेजी होती.मात्र,अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे.यासंदर्भात अधिक स्पष्टतेची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत.

छोट्या कंपन्यांचा बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.८२ टक्क्यांनी वधारला, तर मध्यम कंपन्यांचा मिडकॅप निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी वधारला. बीएसईवर व्यवहार झालेल्या समभागांपैकी २,५०३ वधारून बंद झाले, तर १,५५७ घसरले आणि १६८ इतर अपरिवर्तित राहिले.

क्षेत्रनिहाय निर्देशांकांमध्ये, दूरसंचार विभागात सर्वाधिक २.१८ टक्के वाढ झाली आहे, तर बँकिंग विभाग २.०३ टक्क्यांनी वाढला आहे आणि पॉवर सेगमेंट १.३९ टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, वाहन आणि दैनिक उपभोग उत्पादने (एफएमसीजी) विभागात घसरण झाली.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३,३१८. ०६ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली. शुक्रवारी सेन्सेक्स ४२३.४९ अंकांनी घसरला, तर निफ्टी १०८.६० अंकांनी घसरला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe