विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Mahesh Waghmare
Published:

२१ जानेवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील ठाकरवाडी येथील विवाहित तरुण दत्तू जाधव याने रात्रीच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेतल्याची घटना काल दि. २० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दत्तू महादू जाधव (वय ३८ वर्षे, रा. म्हैसगाव, ठाकरवाडी, ता. राहुरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. मयत दत्तू जाधव हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याला दारूचे व्यसन जडले होते.

मयत दत्तू जाधव व त्याच्या पत्नीचे वारंवार वाद होत असे.या दोघांच्या वादातूनच गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी तीच्या माहेरी पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे निघून गेली असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.त्यामुळे मयत जाधव हा एकटाच आपल्या घरात राहत होता.

दरम्यान काल रात्रीच्या सुमारास त्याने त्याच्या घरासमोर काही अंतरावर असलेल्या एका बोरीच्या झाडाला साडीच्या सहय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.सकाळच्या दरम्यान परिसरातील काही लोकांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक व रुग्णवाहिका चालक रविंद्र देवगीरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

मयत दत्तू जाधव यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा, पत्नी, आई, पाच भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे म्हैसगाव ठाकरवाडी परिसरात खळबळ उडाली असून दत्तू जाधव यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe