विजेच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली ! वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Mahesh Waghmare
Published:

२१ जानेवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर महावितरणकडून विजेचे भारनियमन सुरू आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.सध्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कांदा, मका, हरभरा, भाजीपाला व ऊस लागवडीसह चारा पिकाची लागवड केलेली आहे.

मात्र शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नाही.त्यामुळे विहिरीत पाणी उपलब्ध असताना पिकांना पाणी कसे द्यायचे,याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

तालुक्यातील घारी, देर्डे, मढी, सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच आदी भागासाठी पोहेगाव येथील विद्युत उपकेंद्रा मार्फत विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, कोपरगावकडून येणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनी सतत नादुरुस्त होत असल्याने वीज पुरवठा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने खंडित होत असतो.

वारंवार त्या वीज वाहिनीचा खोळंबा होत असतो. त्यामुळे दुष्परिणाम पोहेगाव विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा होणाऱ्या गावांना भोगावा लागत आहे.
अडविजेचा वार येत आहेत. मात्र वीज वितरणचे अधिकारी यावर कायमस्वरूपीचा तोडगा काढायला तयार नाही, असे नागरीकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे ८ तास मिळणारी वीज ही दिवसभरामध्ये फक्त दिड ते दोन तास मिळत आहे.त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही.परिणामी, शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.विज पुरवठ्याबाबत माहिती देण्यासाठी कर्मचारी, अधिकारी फोन उचलत नाहीत, उचलला तर उडवा-उडवीची उत्तरे देतात, असे पोहेगाव परिसरातील शेतकरी अनिल पवार, अय्युब पाठाण यांनी सांगितले.

तसेच येत्या काही दिवसात महावितरणच्या कारभाराबाबत वीज वितरण कंपनीच्या पोहेगाव कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.वीज महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले भारनियमन शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी बाब ठरत आहे.

शासनाने शेतीसाठी मोफत वीज दिली असली तरी शासनाने आता शेतकऱ्यांना २४ तास कशी वीज उपलब्ध करून देता येईल, यासाठी निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe