ब्रिटिशांनी लुटले ५६ लाख अब्ज ; भारतातून लुटलेली निम्मी संपत्ती १० टक्के श्रीमंतांच्या तिजोरीत !

Mahesh Waghmare
Published:

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : ब्रिटिशांनी १७६५ ते १९०० या कालावधीत भारतातून ६४ हजार ८२० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५६ लाख अब्ज रुपयांची संपत्ती लुटली.यापैकी निम्मी संपत्ती म्हणजे सुमारे ३३,८०० अब्ज डॉलर्सची (२८ लाख अब्ज रुपये) संपत्ती ब्रिटनमधील १० टक्के श्रीमंतांकडे गेल्याची धक्कादायक माहिती ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.

ही संपत्ती किती आहे,याचे उदाहरण द्यायचे झाले,तर संपूर्ण लंडन शहर (सुमारे १५७२ चौरस किमी भूभाग) ५० पौंडाच्या चलनी नोटांनी चार वेळा झाकता येईल.दाओसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीपूर्वी सोमवारी हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.

‘टेकर्स, नॉट मेकर्स’ नामक या अहवालात वसाहतवादाच्या दुष्परिणामांवर भाष्य करण्यात आले आहे.ऐतिहासिक वसाहतवादी काळातील व्यापक असमानता आणि लुटीची विकृती आधुनिक जीवनाला आकार देत आहे.आधुनिक बहुराष्ट्रीय कंपन्या या वसाहतवादाचे फलित आहेत.

ईस्ट इंडिया कंपनीने याची सुरुवात केली होती.ही कंपनी नंतर सत्ताधारी झाली.वसाहतवादाने एक अत्याधिक असमान जगाची निर्मिती केली.गरीब व विकसनशील देशांचे शोषण करणारे आणि विकसित देशांमधील श्रीमंतांचे खिसे भरणारे हे जग आहे,असे अहवालात म्हटले आहे.

वसाहतवादाच्या काळात ब्रिटिशांनी किती लूट केली, याची आकडेवारीही अहवालात मांडण्यात आली आहे. ६४.८२ ट्रिलियन डॉलर्सची (एक ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी) लूट केली. यापैकी ३३.८ ट्रिलियन डॉलर ब्रिटनमधील १० सर्वाधिक श्रीमंत लोकांकडे गेले.

आजही ब्रिटनमधील गर्भ श्रीमंत आपल्या ऐश्वर्याचे श्रेय गुलामगिरी आणि वसाहतवादाला देतात. १७५० मध्ये भारतीय उपखंडाचा जागतिक औद्योगिक उत्पादनातील वाटा सुमारे २५ टक्के होता.वसाहतवादाच्या काळात हा आकडा वेगाने घसरून १९०० सालापर्यंत तो अवघा २ टक्क्यांपर्यंत खाली आला,असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गतवर्षी अब्जाधीशांच्या संपत्तीत तिप्पट वाढ

गतवर्षी जगभरातील अब्जाधीशांची संपत्ती : २ हजार अब्ज डॉलर्सने (सुमारे १ लाख ७५ हजार ५१७ अब्ज रुपये) वाढून १५ हजार अब्ज डॉलर्सवर पोहोचली. २०२३ च्या तुलनेत ही वाढ तिप्पट आहे.

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात अब्जाधीशांच्या संपत्तीत होणारी मोठी वाढ आणि त्या तुलनेत गरीबांची संख्या घटत नसल्याबद्दल तुलनात्मक आकडेवारी मांडली.

जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची संपत्ती सरासरी दरदिवशी सुमारे १० कोटी डॉलर्सने (८६१ कोटी रुपये) वाढली.या श्रीमंतांची ९९ टक्के संपत्ती लुटली, तरी ते अब्जाधीशच राहतील, इतक्या प्रचंड संपत्तीचे धनी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe