२१ जानेवारी २०२५ पाथर्डी : शहरात मावा विक्रेत्यांवर तपास यंत्रणांकडून छापा सत्र सुरू झाल्याने उघड मावा विक्री बंद झाली.आता विक्रेत्यांनी नामी शक्कल लढवत मोबाईल मावा विक्री केंद्र सुरू केले आहेत.विशिष्ट विक्रेत्यांकडून माल घेण्याचा आग्रह व्यवसाय सुरू होण्यातील प्रमुख अडथळा असल्याचे काही विक्रेत्यांशी चर्चा करताना समजले.
शहर व तालुक्यात सुमारे पाचशेहून अधिक मावा विक्री केंद्रे आहेत.येथील माल कल्याण,पुणे या भागातही जातो.गेल्या आठ-दहा दिवसांपासून तपास यंत्रणांकडून विविध कारणे देत मावा विक्रेत्यांवर छापा सत्र सुरू झाले असून,काही विक्रेत्यांच्या घराचीही झडती घेत कच्चा माल व अन्य साधने ताब्यात घेतली गेली.
विविध प्रकारच्या तडजोडी करण्याचा प्रयत्न होऊनही टपऱ्या सुरू करण्यास परवानगी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या व्यावसायिकांनी आता मोबाईल कॉलवर मावा पोहोचवणे सुरू केले.तर काही नेहमीच्या ग्राहकांना विक्रेता माहीत असल्याने विविध चौकात थांबून मोटारसायकल वरील विक्रेत्याकडून काही सेकंदात माल घेतला जातो.
त्यामुळे आता ग्राहकांना सुद्धा घरपोच माल मिळण्याची सुविधा झाली आहे.परगावी पाठवण्याचा माल आता विशेष फिरत्या एजंटांबरोबर पाठविला जातो. कल्पनेपेक्षा मोठ्या प्रमाणात या व्यवहारांमध्ये अर्थशास्त्र अडकले आहे.याबाबत काही विक्रेत्यांनी खा.नीलेश लंके यांचेही लक्ष वेधले आहे.एका शिष्टमंडळाने आ. मोनिकाताई राजळे यांचीही भेट घेत सर्व वस्तुस्थिती सांगितली.याबाबत लवकर तोडगा निघेल,अशा अपेक्षेवर व्यावसायिक लक्ष ठेवून आहेत.