२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना शिवसेनेच्या पाठिंब्याचे पत्र देखील पाठवले आहे.शिवसेनेने यापूर्वी भाजपसोबत युती असताना देखील दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवले होते.
परंतु यावेळी शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.शिंदे यांनी नड्डांना पाठवलेले पाठिंब्याचे पत्र मंगळवारी पक्षाकडून भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना सुपूर्द करण्यात आले. ‘शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना सक्रियपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मी शिवसेनेच्या दिल्लीतील नेत्यांना भाजपसोबत प्रचारात सक्रियपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत,असे शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या नेतृत्वात शिवसेना पक्ष नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचा वाहक आहे.या वारशाचे पालन करत शिवसेना पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक सक्रिय सदस्य असल्याचेही शिंदे म्हणाले.शिवसेनेने यापूर्वी देखील दिल्ली विधानसभा निवडणूक लढली होती.परंतु या पक्षाला अपेक्षित यश आलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस मात्र स्बळावर
एकीकडे महायुतीतील शिवसेना या घटकपक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दर्शवला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्बळावर या निवडणुकीत उतरला आहे.राष्ट्रवादीने ३० उमेदवार देखील जाहीर केले आहेत.
२०२० सालच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा लढल्या होत्या.मात्र पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या नेतृत्वात एकसंध पक्ष होता.