२२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : येथील मुळा प्रवरा वीज संस्थेने निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संस्थेच्या निवडणूकीचे सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे.दरम्यान,मुळा प्रवरा सहकारी संस्थेची निवडणूक शासनाने तातडीने घ्यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१५-१६ ते सन २०२०-२१ पर्यंत या संस्थेवर संचालक मंडळ कार्यरत होते.यानंतर या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली.दरम्यानच्या काळात निवडणूक घेणे क्रमप्राप्त असताना ती न घेतली गेल्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत हे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमावयास शासनास भाग पाडले.
निवडणूक प्राधिकरणाने सद्यस्थितीत राज्यभरातील हजारो सहकारी संस्थांच्या निवडणूकीवरील स्थगिती उठवली आहे.मुळा प्रवरा वीज संस्थेचे कामकाज सद्यस्थितीत बंद आहे.उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार या संस्थेची निवडणूक होणे क्रमप्राप्त आहे.निवडणूक प्राधिकरणाने संस्थेच्या संचालक मंडळास निवडणूक घेण्यासाठीचे दिड कोटी रुपये भरावेत,असा आदेश संस्थेचे तत्कालीन चेअरमन, माजी खा. डॉ. सुजय विखे यांच्या कार्यकाळातच निर्गमित केला होता.
संस्थेकडे आजही कोट्यावधी रुपये पडून असले तरी त्यावर काही निर्बंध आहेत.निवडणूक घेण्यासाठी लागणारी रक्कम भरण्यासाठी प्राधिकरणाने मार्गदर्शन करावे,अशा प्रकारची मागणी मुळा प्रवरा संचालक मंडळाने त्यावेळी केली होती.अद्याप प्राधिकरणाने या संदर्भातील कोणताही खुलासा आणि मार्गदर्शन ही केलेले नाही.यामुळे या संस्थेची सद्यस्थितीत निवडणूक तळ्यात आणि मळ्यात सुरू आहे.
त्यामुळे संस्थेचे प्रशासक रावसाहेब खेडकर यांनी याबाबत तातडीने खुलासा करून निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार संस्थेच्या निवडणूकीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करावा,अन्यथा संस्थेच्या लाखभर सभासदांच्या आंदोलनाला त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,असेही भोसले म्हणाले आहे.