नगरमधून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले ; अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिस ठाण्यात पुन्हा २ गुन्हे दाखल

Mahesh Waghmare
Published:

२३ जानेवारी २०२५ नगर : नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून अशाच आणखी दोन घटना नगर शहरात घडल्या आहेत.तारकपूर बसस्थानकातून एका १५ वर्षीय तर केडगावच्या नेप्ती रोड परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना ताज्या असताना २१ जानेवारीला सकाळी काटवन खंडोबा परिसरातून १६ वर्षीय तसेच दुपारी लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे.

याप्रकरणी २ अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचे २ गुन्हे कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत काटवन खंडोबा परिसरातून १६ वर्षीय मुलगी सकाळी १० च्या सुमारास शेजारी कामानिमित्त जावून येते असे सांगून घराबाहेर पडली ती पुन्हा घरी आलीच नाही.

तिच्या कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. त्यामुळे आपल्या बहिणीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले असल्याची फिर्याद सदर मुलीच्या बहिणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत एमआयडीसी परिसरातील एका गावात राहणारी १७ वर्षीय मुलगी दुपारी तिच्या आईला सीईटीचे फॉर्म भरण्यासाठी मैत्रिणी सोबत नगरमधील महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून गेली. ती पुन्हा परतली नाही.

त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले असल्याची फिर्याद सदर मुलीच्या आईने २१ जानेवारीला सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe