‘आप’त्तीपासून मुक्त झाल्यास दिल्लीचा विकास – मोदी ; पराभवाच्या भीतीपोटी आपकडून घोषणांचा पाऊस

Mahesh Waghmare
Published:

२३ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या ‘आप’ त्तीपासून मुक्तता मिळाली तरच दिल्ली ही विकसित भारताची राजधानी बनू शकेल,असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आतापासूनच पराभवाची चाहूल लागली आहे.

त्यामुळे त्यांच्याद्वारे दररोज एका नव्या लोकप्रिय घोषणेचा पाऊस पाडला जात असल्याचा टोला मोदींनी लगावला. दिल्लीला ‘आप’त्तीने संकटात लोटले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना दिल्लीतून हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमो अॅप’च्या माध्यमातून ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी मोदींनी आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा ‘आप’त्ती संबोधत जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, दिल्लीची जनता आम आदमी पक्षाची ‘आप’त्ती आणि खोट्या आश्वासनांना वैतागली आहे. अगोदर काँग्रेस व त्यानंतर आता आपने दिल्लीकरांचा विश्वासघात केला आहे.

हे ‘आप’त्तीवाले दररोज एक नवी घोषणा करीत आहेत. याचाच अर्थ त्यांना दररोज पराभवाची जाणीव होत आहे. पराभवाच्या भीतीमुळेच ‘आप’ वाले एवढे धास्तावले आहेत की, त्यांच्यावर दररोज एक नवी घोषणा करण्याची नामुष्की ओढावली आहे. आता दिल्लीवासीयांना आपचा खेळ समजला आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आपला पराभवाचा दणका देण्याचा चंग बांधला आहे, अशा शब्दांत मोदी कडाडले. आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा आपचे नेते करीत आहेत.पण, ते आल्याने पुन्हा भ्रष्टाचार करतील, असे जनता म्हणत आहे.

म्हणूनच भाजपच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांनी ‘आप’ त्तीवाल्यांची पोलखोल करावी व केंद्र सरकारचे यश जनतेपुढे मांडण्याचे आवाहन मोदींनी केले.दिल्लीत कितीही कडाक्याची थंडी पडली तरीही जास्तीत जास्त मतदारांना बूथपर्यंत नेण्याचे उद्दिष्टं ठेवावे. यंदा कोणत्याही स्थितीत दिल्लीत भाजपचे सरकार बनवण्याचा आपला हेतू असल्याचे मोदींनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe