चहाच्या ठेल्याप्रमाणे बोल्हेगावमध्ये अवैध गावठी दारुचे धंदे सुरु असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला सर्रासपणे गावठी दारुचे धंदे सुरु असल्याने महिला व युवतींना दारुड्यांपासून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोल्हेगाव मधील गांधीनगर व श्रीराम चौकातील रस्त्यावर सुरु असलेल्या गावठी दारुचा धंदा बंद व्हावा, या उद्देशाने सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी आयुक्तांना तर अवैध धंद्यावर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रश्नाची दखल न घेतल्यास स्थानिक नागरिक, महिलांसह दारू बाटली आंदोलन करण्याचा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी दिला आहे.
गांधीनगर रस्त्याच्या कडेला व श्रीराम चौकातील बेकरी शेजारी अतिक्रमण करुन गावठी दारुचा धंदा थाटण्यात आला आहे. या अवैध धंद्याच्या परिसरात तीन महिन्यापूर्वी बेवारस मृत देह देखील आढळून आले होते. गावठी दारुच्या धंद्यांमुळे परिसरातील नागरिकांसह महिला वर्गाला दारुड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार करुनही त्यांचे अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. 14 जानेवारी रोजी महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र मकर संक्रांत असल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
गावठी दारुच्या धंद्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याने त्यांचे अतिक्रमण हटवावे व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.