पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, तलावात फेकले ; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचे धक्कादायक कृत्य

Sushant Kulkarni
Published:

२४ जानेवारी २०२५ हैदराबाद : तेलंगणात एका निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवून तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट उपनगरातील ही घटना आहे.मृत महिलेचे नाव माधवी आहे.३५ वर्षीय माधवीचे १३ वर्षांपूर्वी गुरुमूर्ती नामक व्यक्तीसोबत लग्न झाले होते.गुरुमर्ती हा निवृत्त लष्करी कर्मचारी असून, तो कंचनबाग परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करतो.माधवी १६ जानेवारीपासून बेपत्ता आहे.तिच्या आईने १८ जानेवारी रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

१६ जानेवारी रोजी भांडण झाल्यानंतर माधवी घर सोडून गेल्याचे गुरुमूर्तीने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. माधवीच्या आई-वडिलांनी मात्र आपल्या तक्रारीत गुरुमूर्तीवर संशय व्यक्त केला.मीरपेट पोलिसांनी गुरुमूर्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.

गुरुमूर्तीने दिलेल्या माहितीनुसार १६ जानेवारी रोजी भांडण झाल्यानंतर त्याने पत्नीची हत्या केली.नंतर तिच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे केले.हे तुकडे त्याने कुकरमध्ये शिजवले. मांसापासून हाडे वेगळी करून ती मुसळीच्या साहाय्याने ठेचून त्यांचा भुगा केला आणि ते देखील कुकरमध्ये शिजवले.

तीन दिवस तो मृतदेहाचे मांस व हाडे शिजवत होता.त्यानंतर हे सर्व पिशवीत भरून ते मीरपेट येथील एका तलावात फेकले.गुरुमूर्तीने दिलेली ही माहिती ऐकून पोलीस देखील हादरले. त्याला तत्काळ अटक करण्यात आली आणि माधवीचे अवशेष शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.

परंतु बुधवार संध्याकाळ पर्यंत पोलिसांना कथितरीत्या मृत माधवीचे अवशेष सापडलेले नाहीत.त्यामुळे पोलीस देखील बुचकळ्यात पडले आहेत.माधवीच्या मृतदेहाचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने ती बेपत्ताच झाली असावी,अशी शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe