२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता मिळाली तर येत्या पाच वर्षांत राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणणार आहोत, अशी ग्वाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली आहे.रोजगार निर्मिती कशी करावी, याची आम्हाला चांगली जाणीव आहे.
म्हणूनच आम्ही दिल्लीतील युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार फड सध्या चांगलाच रंगला आहे.काँग्रेस, भाजप व सत्तारूढ आम आदमी पक्ष (आप) दिल्ली वासीयांना मोठ मोठी आश्वासने देत आहे.याच घटनाक्रमात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
यात रोजगार वृद्धीवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगत ते म्हणतात की, दिल्लीतील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. आमची टीम बेरोजगारीचा मुद्दा सोडवण्यासाठी एक विस्तृत मसुदा तयार करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षाच्या मागील सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत केजरीवाल म्हणाले की, पंजाबमध्ये आप सरकारने अवघ्या दोन वर्षांत ४८,००० शासकीय नोकऱ्या दिल्या आहेत.
युवकांसाठी तीन लाखांहून अधिक खासगी नोकऱ्यांची सुविधा प्रदान केली आहे.रोजगारनिर्मिती कशी होते ? याची आम्हाला चांगली जाणीव आहे. आमचे इरादे प्रामाणिक आहेत. जनतेच्या पाठबळाच्या जोरावर आम्ही पुढील पाच वर्षांत दिल्लीतून बेरोजगारी संपुष्टात आणणार आहोत, असे त्यांनी ठासून सांगितले.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा आप चा प्रयत्न आहे. परंतु, आप पुढे भाजपचे तगडे आव्हान आहे.त्यामुळे मागील प्रमाणेच यंदा आप सत्ता पादाक्रांत करण्याचा करिष्मा दाखवणार काय ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.