२४ जानेवारी २०२५ नेवासा : तालुक्यातील सौंदळा येथील मंदिरातील गणपती मूर्ती चोरी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदळा येथील मंदिरातील (दि. ३) जानेवारी रोजी ४ हजार रुपये किंमतीची गणपती मूर्ती चोरी गेली होती.या चोरी प्रकरणी संशयित संजय मोहन आरगडे (रा. सौंदाळा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी प्रारंभी अ-दखलपात्र गुन्हा नोंदवला होता.
मंदिरातील चोरी झाल्यानंतर सौंदाळा परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या.या तीव्र भावनेची दखल नेवासा पोलिसांनी गांभीर्याने घेऊन नेवासा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना मूर्ती चोर शोधण्यासाठी कामास लावून तपासाची चक्री वेगाने फिरवली होती.
मंदिरातील गणपती मूर्ती चोरट्याचा शोध घेण्यासाठी मंदिर परिसरातील व सौंदाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घटनेच्या दिवशी दुपारी अडिच सुमारास एक संशयित दुचाकीवर संशयतरित्या जात असल्याचे दिसून आले होते.त्यामुळे पोलिसांनी सदर संशयिताची दुचाकी गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून संशयितापर्यंत पोहोचले असता, तेथे नवनाथ कडू (रा. बाभुळखेडा) हा इसम मिळून आला.
पोलिसांनी सदर इसमास चोरी बाबत विचारणा केली असता,प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच चोरी प्रकरणी कबुली दिली व चोरलेली गणपतीची मूर्ती देखील काढून दिली.ही कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे, नारायण डमाळे सुमित करंजकर, अविनाश वैद्य, भारत बोडके व अरुण गांगुर्डे यांनी केली आहे.