पुण्याबरोबरच ‘या’ जिल्ह्यात आढळले रुग्ण : मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Mahesh Waghmare
Published:

२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जीबीएस तथा मेंदू व्हायरसचे रुग्ण आता पुण्याबरोबरच कोल्हापूर, नागपूर, सोलापूर येथेही आढळून आले आहेत. हा वाढता फैलाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतला असून, जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मंगळवारी दिल्या. हा आजार आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

हा फैलाव आता राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारनेही गांभीर्याने घेतला आहे. केंद्राकडून नियुक्त विशेष समितीचे सदस्य पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात खडकवासला, धायरी, नांदेड, किरकटवाडी या परिसरात दूषित पाण्यामुळे हा आजार पसरल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पाणी उकळून प्या आणि शिळे अन्न खाऊ नये, मांस पूर्णपणे शिजवूनच खावे, अशा सूचना आरोग्य विभागाने नागरिकांना केल्या आहेत. मात्र जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

पुणे शहरातील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हा आजार दुर्मीळ आहे, पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. याबाबत पुण्यात आढावा घेतला आहे.

उपचार आणि तपासणीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
याच अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe