३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवण्याकरिता शिफारशी करण्याबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या २० आजारांपैकी इतर शासकीय योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांचे पुनर्विलोकन करणे तसेच सहाय्यता मिळण्याकरिता नवीन आजार समाविष्ट करण्याबाबत शिफारस करणे, रस्ते अपघात वगळून इतर अपघात प्रकरणामध्ये घ्यावयाच्या कागदपत्रांची निश्चिती करणे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता आजारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यांच्या रकमांचे पुनर्विलोकन (समीक्षण) करून अनुज्ञेय रक्कम (मंजूर रक्कम) नव्याने निर्धारित करण्याची शिफारस करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता रुग्णालय संलग्नीकरणासाठी रुग्णालयाच्या तपासणीचे महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरवण्याबाबत शिफारस करणे.
याकरिता ही समिती गठीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वैद्यकीय उपचाराबाबत वेळोवेळी विविध विषयांच्या अनुषंगाने विचारणा केल्यास ही समिती त्या विषयांबाबत शिफारस सादर करेल.