भगवानगडावरून नामदेव शास्त्री महाराजांचा मुंडेंना पाठिंबा ! म्हणाले धनंजय मुंडे खंडणीवर…

Ahmednagarlive24
Published:

राज्यात मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भगवानगड भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीनंतर आज नामदेव शास्त्री महाराजांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “धनंजय मुंडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते नाहीत, त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे.”

जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले

नामदेव शास्त्री महाराज म्हणाले, “धनंजय मुंडे गडावर आले तेव्हा त्यांची मानसिकता समजून घेतली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे समाजात गैरसमज पसरवला जात आहे. त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. यामुळे संप्रदायाचेही नुकसान होत आहे.”

यासोबतच त्यांनी माध्यमांवरही प्रश्न उपस्थित केला. “मीडिया फक्त एकाच बाजूने बातम्या देत आहे. या प्रकरणामागील सत्य काय आहे, याचा शोध घेतला जात नाही. हत्या झाली, पण त्या व्यक्तींची मानसिकता का बिघडली, त्यांना आधीच जी मारहाण झाली होती, याची चर्चा का केली जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे”

भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठिशी असल्याचे सांगताना नामदेव शास्त्री महाराज म्हणाले, “गेल्या ५३ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मीडिया ट्रायल सुरू आहे. मात्र, त्यांना गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नेते नाहीत.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रकरणाला राजकीय हवा देण्यात आली असून, समाजात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe