३१ जानेवारी २०२५ वळण : बारागाव नांदूर व इतर १४ गावांच्या संयुक्त पाणी योजनेच्च्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरुवारी पार पडली.बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, १० फेब्रुवारी पर्यंत ज्या ग्रामपंचायतींची पाणी पट्टी थकीत आहे, त्यांनी ती भरून योजनेला सहकार्य करावे, अन्यथा, थकीत पाणीपट्टी असलेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद ठेवून इतर गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल.तसेच सहा दिवसांच्या खंडानंतर अखेर योजनेचा पाणीपुरवठा आज पासून पूर्ववत सुरू करण्यात आला.
दि.२५ जानेवारी पासून बारागाव नांदूर व इतर १४ गावांपैकी ११ गावांनी मोठ्या प्रमाणावर पाणी पट्टी थकविल्याने योजनेने पाणी पुरवठा बंद केला होता.यामुळे पाणी पट्टी वेळेवर भरणाऱ्या शिलेगाव, केंद्र बुद्रुक, पिंपरी चणकापूर आणि तांदूळवाडी या ग्रामपंचायतींनी ‘आमचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा’ अशी मागणी गटविकास अधिकारी आणि वोजनेकडे लावून धरली.
तथापि, ११ ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणावर थकीत पाणी पट्टी असल्याने त्यांना सवलत देण्यात आली.तरीही अपेक्षित रक्कम जमा झाली नाही.परिणामी,या अकरा गावांतील नागरिकांमध्ये नाराजी पसरली.अखेर गुरुवारी दुपारी पंचायत समितीच्या स्व. डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात योजनेच्या सदस्यांची बैठक पार पडली.
बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली.गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सर्व ग्रामपंचायत अधिकारी व पाणी योजनेच्या सरपंच सदस्यांना ‘सन २०२३-२४ ची थकीत पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी’ असे आवाहन केले.
बैठकीत सर्वानुमते पुढील ठराव मंजूर करण्यात आलेः १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व थकीत पाणीपट्टी भरावी,१० फेब्रुवारी नंतरही ज्या गावांची पाणीपट्टी थकीत राहील, त्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, तर इतर ग्रामपंचायतींना सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. सन २०२४-२५ ची सर्व पाणीपट्टी ३१ मार्च २०२५ पर्यंत जमा करणे बंधनकारक राहील.
बैठकीस धनराज गाडे, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे,रवींद्र म्हसे, प्रभाकर गाडे, रेणुका गावडे, रावसाहेब पवार, नंदकुमार डोळस, शिवाजी शेंडे, आप्पासाहेब तमनर, संजय तमनर, नितीन कल्हापुरे, कुलदीप शिरसाठ, साहेबराव म्हसे, गोरख म्हर्स, विजय माळवदे, सुरेश म्हसे
बापूसाहेब धसाळ, दत्तात्रेय खुळे, अशोक कुलट, शामराव आढाव, नानासाहेब आढाव, गणपत पेरणे, अण्णासाहेब देवरे, प्रमोद तारडे, विजय चव्हाण, वैभव जरे, जालिंदर कानडे, राधेश्याम जाधव, वृद्धेश्वर आगलावे, ऋषी डमाळे, राहुल तमनर यांच्यासह जिल्हा परिषद उपविभागीय उपअभियंता पी. बी. जायभाये
शाखा अभियंता दीपक परदेशी, योजनेचे सचिव तथा विस्तार अधिकारी तानाजी कोकाटे, देखभाल दुरुस्ती समन्वयक शौकत इनामदार आणि इतर सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
शिलेगावच्या सरपंच गणपत म्हसे, विजय माळवदे, सुरेश म्हसे, ग्रामविकास अधिकारी वनिता कोहकडे, केंदळ बुद्रुकचे सरपंच अण्णासाहेब देवरे, प्रमोद तारडे, विजय चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती ए. ए. एल. भिसे ,पिंपरी चणकापूरचे सरपंच राजूभाऊ शेटे, वैभव जरे, जालिंदर कानडे, ग्रामपंचायत अधिकारी जी. पी. गांधले यांचाही सत्कार करण्यात आला.
बैठकीत वाद
चर्चेदरम्यान एका सदस्याने ‘ग्रामपंचायत अधिकारी संगनमताने पाणीपट्टी वसुलीचे दाखले देतात, त्यामुळे योजनेची वसुली होत नाही’ असा आरोप केला. यावर ग्रामपंचायत अधिकारी दादा भिंगारदे, सुरेश डोंगरे आणि प्रभाकर चव्हाण यांनी ‘हा आरोप चुकीचा असून आम्ही नियमानुसार काम करत आहोत’ असा ठाम विरोध दर्शविला.
थकीत पाणीपट्टी भरून विक्रम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार
बैठकीत तांदूळवाडी ग्रामपंचायतीने २०२३-२४ तसेच चालू सन २०२४-२५ ची पाणीपट्टी भरून विक्रम केल्याने सरपंच गणपत पेरणे, ग्रामपंचायत अधिकारी संजय भिंगारदे आणि राहुल साळवे यांचा योजनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.