Share Market Today : आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्यात. करदात्यांना दिलासा देण्यात आला. बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा आज केंद्र वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
दरम्यान आज बजेटचा दिवस असल्याने शेअर मार्केटमध्ये देखील मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. आज सकाळी शेअर मार्केट तेजीसह खुले झाले मात्र नंतर मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आज 1 फेब्रुवारी रोजी, अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यवसायात चढ-उतार सुरु होते. शेअर बाजाराने व्यवहाराला सकारात्मक सुरुवात केली.
तथापि, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्राप्तिकरात सूट देण्यासह अनेक मोठ्या घोषणा करूनही नंतर त्यात घट झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे २७ हजार कोटी रुपये बुडालेत, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. आज ब्रॉडर मार्केटमध्येही संमिश्र कल दिसून आला.
BSE मिडकॅप निर्देशांक 0.49 टक्क्यांनी घसरला आणि लाल रंगात बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.28 टक्क्यांनी वाढून बंद झाला. आजच्या व्यवहारादरम्यान ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल इस्टेट आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे कॅपिटल गुड्स, पॉवर, पीएसयू निर्देशांक 2-3 टक्क्यांनी घसरलेत. व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 5.39 अंक किंवा 0.01 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 77,505.96 वर बंद झाला.
दरम्यान, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 26.25 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी घसरला आणि 23,482.15 वर बंद झाला. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 फेब्रुवारी रोजी 423.75 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 31 जानेवारी रोजी 424.02 लाख कोटी रुपये होते.
अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 27,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 27,000 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मात्र या घसरणीच्या काळातही स्टॉक मार्केटमध्ये काही स्टॉक मजबूत तेजीत दिसलेत.
हे स्टॉक आज जबरदस्त तेजीत राहिलेत
आज बजेटचा दिवस असल्याने बाजारात चढ-उतार होईल असे वाटत होते. झालं देखील तसंच बाजारात आज मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. शेवटी बाजारात एक मोठी घसरण आली आणि यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडलेत.
पण अशा या परिस्थितीमध्ये देखील बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी 16 शेअर्स हे हिरव्या रंगावर म्हणजेच वाढीसह बंद झाले. यामध्ये झोमॅटोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७.१७ टक्के वाढ झाली आहे. यापाठोपाठ मारुती सुझुकी, आयटीसी हॉटेल्स, आयटीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) 2.96 ते 4.98 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
या स्टॉक्समध्ये झाली मोठी घसरण
सेन्सेक्समधील उर्वरित 14 स्टॉक आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडचे शेअर्स सर्वाधिक 3.71 टक्क्यांनी घसरलेत. तर, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि एचसीएल टेकचे समभाग ०.१४ टक्क्यांपासून ३.३६ टक्क्यांपर्यंत घसरले.