Ahilyanagar News : कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी…या प्रश्नाचे उत्तर आज (रविवारी दि.२) सायंकाळी ५ वाजता मिळणार आहे. येथील वाडियापार्क मधील (कै.) बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे.
यातील विजेत्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते चांदीची गदा व चारचाकी गाडीची चावी दिली जाणार आहे. मागील चार दिवसांपासून वाडियापार्कवर कुस्त्यांचा महासंग्राम सुरू आहे. राज्यभरातील नऊशेहून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
माती व गादी अशा दोन विभागात या स्पर्धा होत आहेत. आज रविवारी सायंकाळी माती विभागातील विजेता व गादी विभागातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. महाअंतिम सामन्याचा महाथरार यानिमित्ताने कुस्तीशौकिनांना अनुभवता येणार आहे.
या अंतिम लढतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या चांदीच्या गदेबरोबरच आमदार संग्राम जगताप यांच्यावतीने थार ही अलिशान चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या कुस्तीगीरास बोलेरो ही चारचाकी गाडी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.
राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. जगताप यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आत्तापर्यंत झालेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये केवळ पहिल्या विजेत्या व उपविजेच्या अशा दोनच स्पर्धकांनाच बक्षिसे दिली जात होती.
पण यावर्षी अहिल्यानगरमधील वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकालाही खास बक्षीस दिले जाणार आहे. माती विभागात नऊ आणि गादी विभागात नऊ अशा १८ वजनी गटांमध्ये ही स्पर्धा झाली आहे.
त्यामुळे या सर्व गटांमधील प्रत्येक विजेताला एक बुलेट मोटरसायकल, उपविजेत्याला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पहिलवानाला अर्धा तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षिसे दिली जाणार आहे. या बक्षिसांसाठी थार कार, बोलेरो कार तसेच १८ बुलेट, २० स्प्लेंडर आणि ३० सोन्याच्या अंगठ्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.