Ahilyanagar News : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर सौर पंप दिले मात्र दोन दिवसातच ते पंप बंद पडले . ते पंप दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी न मिळाल्याने गेले दोन महिन्यापासून पाणी असूनही शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत.
त्यामुळे हे पंप जर दोन दिवसांत दुरुस्त केले नाही तर संबंधित सोलर कंपनी विरोधात नुकसानभरपाईची तक्रार ग्राहक मंचात करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर पंप बसवण्यासाठी प्रवृत केले आहे.
हे अनुदानावरील सौर पंप घेताना देखील अनेकांचे हात ओले केल्याशिवाय मिळत नाहीत. मिळाले तर सदर कंपन्या या सौर पंप बसवुन एकदा पाणी काढुन फोटो काढुन मोकळे होतात. परंतु त्यानंतर यात काही घोटाळा झाला तर दुरुस्तीला कंपनीचा कोणीही माणूस येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘भिक नको पण, कुत्रे आवर’ अशी झाली आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात सोलर पंप बसवलेले आहेत. पंप बसवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे ठराविक तास पंप चालला, परंतु त्यानंतर पंप बंद पडला. याबाबत कंपनीकडे संपर्क साधुन पंप बंद पडल्याची शेतकऱ्यांनी वेळोवेळी कल्पना दिली. परंतु गेली दोन अडीच महिने झाले तरी कंपनीने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही.
तसेच सोलर पॅनल बरोबर ज्या कंपनीचा कंट्रोल आला आहे. या कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर मोबाईलद्वारे संपर्क साधुन या कंपनीलाही कंट्रोल बंद असल्याचे वेळोवेळी सांगितले. परंतु या दोन्हीही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.
त्यामुळे गेली दोन ते अडीच महिने पंप बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. तरी या गोष्टी जबाबदार असणाऱ्या संबंधित कंपनीवर शासनाने कारवाई करावी तसेच जर आठ दिवसात सोलर पंप दुरुस्त केले नाही, तर या कंपन्या विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करणार असल्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.