Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढवण्यासाठी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार जानेवारी अखेर १०० टक्के शास्ती माफ करण्यात आली होती. यात ८८४५ मालमत्ता धारकांनी सवलतीचा लाभ घेतला.
आता नागरिकांच्या मागणीनुसार १५ फेब्रुवारीपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. १५ दिवस मुदत वाढवून देण्यात आली असून, थकबाकीदार नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिकेने ८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत १०० टक्के शास्तीमध्ये सवलत दिली होती. तर फेब्रुवारी महिन्यात ७५ टक्के सवलत दिली होती. जानेवारी महिन्यात ८८४५ थकबाकीदारांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला. मात्र, नागरिकांकडून १०० टक्के शास्ती माफीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याचा विचार करून आता १५ फेब्रुवारी पर्यंत १०० टक्के शास्तीमाफीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
थकबाकीदारांनी या १०० टक्के सवलत योजनेचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा. महानगरपालिका प्रशासनाने सर्व प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. जप्ती कारवाई सुरू असून, १५ फेब्रुवारीनंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
त्यामुळे जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार मालमत्ता धारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.