Ahilyanagar News: नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आता परत एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. नुकताच तसा शासन निर्णय उपसचिव तुषार महाजन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. त्यामुळे परत एकदा पालकांना नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे.
इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यां ना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वहयांची पाने समाविष्ट करून पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता,परंतु विद्यार्थी पुस्तकांसह सोबत वहया देखील घेऊन येत होते.ही बाब लक्षात घेता,आता येत्या शैक्षणिक वर्षा पासून पूर्वीप्रमाणेच नियमित पाठयपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत.यात वहयांच्या पानांचा समावेश असणार नाही.
शिक्षण व शैक्षणिक साहित्याचे सार्वत्रिकरण होणे,प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचणे,पाठयपुस्तक व वहया यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे,दप्तरा च्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबत राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे.या सर्व मुद्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून इयत्ता २री ते इयत्ता ८वी च्या पाठयपुस्तकांमध्ये वहयांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता.
पाठयपुस्तकात कोरी पान देण्याचा निर्णय शासनाने मागे घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात शासनाने १०० टक्के विद्यार्थ्यांना नवीन पाठयपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका वितरीत कराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.