३ फेब्रुवारी २०२५ गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड पंचायत समितीच्या माजी सभापतीची नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कियर गावात उघडकीस आली.सुखराम मडावी (४५) असे हत्या करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या माजी सभापतीचे नाव आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या असताना या हत्येने पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.मृत मडावी यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात नक्षलवाद्यांनी खोटा आरोप केला आहे की, सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते.त्यांनी परिसरात पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती आणि पोलिसांना माहिती पुरवत होते.
दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांचे आरोप फेटाळून लावत नक्षलवादी निरपराध नागरिकांची हत्या करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी हे कियर येथील रहिवासी असून, ते भामरागड पंचायत समितीचे सन २०१७ ते २०१९ या अडीच वर्षांच्या कालावधीत सभापती होते.
त्यानंतर त्यांनी अडीच वर्षे उपसभापती म्हणून कार्य केले. भामरागड तालुका मुख्यालयापासून कियर हे गाव १२ किमी अंतरावर आहे. कोठी पोलीस मदत केंद्रात कियर गावाचा समावेश असून, शनिवारी रात्री सशस्त्र नक्षलवादी कियर गावात आले. त्यानंतर त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांची गळा दाबून हत्या केली.