सौरपंप बसविल्यानंतर दोन दिवसांत पडले बंद ; पाणी असूनही शेतकऱ्यांची पिके जळाली

Sushant Kulkarni
Published:

३ फेब्रुवारी २०२५ कर्जत : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर दिलेले सौर पंप दोन दिवसांतच बंद पडल्याने व ते दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी न मिळाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी असूनही शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत.दरम्यान, हे पंप दोन दिवसांत दुरुस्त न केल्यास सहज सोलर कंपनी विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याचा इशारा मिरजगाव येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी सौरपंप बसवण्यासाठी प्रवृत केले आहे.हे सौरपंप घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय मिळत नाहीत.मिळाले तर सदर कंपन्या या सौरपंप बसवून एकदा पाणी काढून देतात.त्यानंतर यात काही घोटाळा झाला तर दुरुस्तीला कंपनीचा प्रतिनिधी येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘भीक नको पण, कुत्रे आवर’ अशी झाली आहे.

मिरजगाव येथे सुधीर आखाडे व काशिनाथ क्षीरसागर यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सहज कंपनीचे सोलरपंप बसवले होते.पंप बसवल्यानंतर पंप दोन तास चालला; परंतु त्यानंतर पंप बंद पडला. याबाबत सहज कंपनीकडे संपर्क साधून पंप बंद पडल्याची शेतकऱ्यांनी कल्पना दिली; परंतु दोन अडीच महिने झाले तरी कंपनीने या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.

तसेच सोलर पॅनलबरोबर आलेला रोटो सोल कंट्रोल बंद असल्याचे कंपनीला कळविले; परंतु सहज कंपनी व रोटो सोल कंपनीने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. गेले दोन ते अडीच महिने पंप बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या संबंधित कंपनीवर शासनाने कारवाई करावी,अशी मागणी काशिनाथ क्षीरसागर, सुधाकर आखाडे, श्री. वडवकर यांनी केली आहे.आठ दिवसात सोलर पंप दुरुस्त केले नाही, तर या कंपन्याविरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe