देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

Sushant Kulkarni
Published:

३ फेब्रुवारी २०२५ सुरगाणा : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची लक्झरी बस दरीत कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला तर ४५ जण गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान येथून जवळच असलेल्या गुजरातमधील सापुतारा घाटात ही दुर्घटना घडली. हे सर्व भाविक उत्तर प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्याच्या गुना, शिवपुरी भागातील रहिवासी आहेत.

उत्तर प्रदेश राज्यातील भाविक चार खासगी लक्झरी बसेसने २३ डिसेंबर २०२४ रोजी देवदर्शनासाठी निघाले होते. महाराष्ट्रातील शिर्डी, नाशिक येथे देवदर्शन करून ते त्र्यंबकेश्वरला आले. तेथून देवदर्शन आटोपून रात्री उशिरा सापुतारामार्गे गुजरातमधील द्वारकेला निघाले.

मध्यरात्रीनंतर या चारही बसेस सापुतारा येथे पोहोचल्या.या ठिकाणी चहा-नाश्ता आटोपून सर्व भाविक साडेचार वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी निघाले. गुजरातमधील सापुतारालगत असलेला घाट उत्तरत असताना सापुतारा ते माळेगाव दरम्यान एक बस सुमारे ३० फूट खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघातात तीन पुरुष आणि दोन महिला अशा पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक, एजंटचा समावेश आहे, तर ४५ भाविक जखमी असून, त्यातील आठ जण गंभीर आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe