४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : महावितरण कंपनीकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला इनफ्रास्ट्रक्चर वापरापोटी मिळणारे दरमहा ५ कोटी रुपयांचे भाडे बंद झाले आहे. २०१० ते जानेवारी २०२५ अशी सुमारे १५ वर्षे हे भाडे संस्थेला मिळत होते.मुळा प्रवरा वीज संस्थेने महावितरण कंपनीचे वीजबिल देणे थकविल्याप्रकरणी वीज नियमक आयोगाने संस्थेला बीज परवाना नाकारला होता.
त्यानंतर २०१० पासून संस्थेचे काम बंद असले, तरी संस्थेच्या मालकीचे हजारो पोल,शेकडो वीज रोहित्र, असंख्य भूखंड आणि लाखो किलोमीटर असलेल्या तारांचे जाळे, यापोटी दरमहा ५ कोटी रुपये भाडे म्हणून महावितरण कंपनी मुळा-प्रवरा वीज संस्थेला देत होती.ते आता पूर्णपणे बंद झाले आहे.महावितरण कंपनीने संस्थेच्या जाळे वापरापोटी यापुढेही हे भाडे चालू ठेवावे, अशी कोणतीही मागणी संस्थेने अद्याप केलेली नाही, हे विशेष.
याबाबत अचंबा व्यक्त केला जात आहे. संस्थेच्या लाखो सभासदांची ही मालमत्ता महावितरण कंपनी आता फुकटात वापरणार आहे.वीज वितरणाचा परवाना मिळावा, यासाठी संस्थेने आयोगाकडे मागणी केली आहे.त्यावरील निकाल अद्याप पर्यंत अनिर्णित आहे. स्वतःची मालमत्ता आणि मिळालेले भाडे, असे कोट्यवधी रुपये संस्थेकडे आजही आहे.
असंचित तोट्यावरून संस्थेला वीज वितरण परवाना न देणाऱ्या वीज नियमक आयोगाने संस्थेची कोणतीही एक बाजू ऐकून न घेता राजकीय दबावापोटी संस्थेवर कारवाई केली आहे.दरम्यान, केवळ इच्छाशक्ती अभावी आणि हेतूपुरस्परपणे या संस्थेचे सर्व ते चांगले प्रश्न अडगळीला पडले आहे. प्रशासक रावसाहेब खेडकर या सर्व त्या प्रश्नांना कशाप्रकारे वाट मोकळी करून देतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
..तर तालुक्यासाठी नवीन पर्व
राजकीय साठमारीत एका बलाढ्य संस्थेचा बळी गेला. हजारो कामगार आणि वीज ग्राहकांची ससेहोलपट झाली. संस्था सुरू झाली, तर सोन्याहून पिवळे आहे. त्यातच तालुक्यात एक नवीन पर्व पुन्हा सुरू होईल. वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी आणि तालुक्यातील जनतेने हा प्रश्न हाती घेतला, तर श्रीरामपूरच्या मातीला नवा स्पर्श मिळेल – शफीक बागवान, ग्राहक, मुळा-प्रवरा वीज संस्था.