४ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : शहरातील अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात आ. मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ना. विखे बोलत होते.
या वेळी तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, अॅड. अंकुशराव गर्जे, भीमराव फुंदे, दिलीप भालसिंग रणजीत बेळगे, कचरू चोथे, काशीनाथ पाटील लवांडे, आशुतोष डहाळे, सुभाष बर्डे, संदीप पठाडे, अशोकराव चोरमले, सुनील ओव्हळ, काकासाहेब शिंदे, अमोल गर्जे, अजय रक्ताटे, संजय फुंदे, दादा पाटील कठाळी, नितीन गर्जे, कैलास देवढे, लक्ष्मण काळे, अजित देवढे, उपस्थित होते.
यावेळी ना. विखे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास जिल्ह्यातील नेतेच करू शकतात.बाहेरची मंडळी या ठिकाणी येऊन फक्त भांडणे लावतात.तुमच्याकडे अनेक वर्षे राज्याची सत्ता होती.त्यावेळी आपण झोपला होतात का,असा सवाल करत जाणता राजाने एकही योजना जिल्ह्यासाठी अंमलात आणली नाही,अशी टीका नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली.
या वेळी सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की,माझ्यासमोर बलाढ्य शक्ती होती, तरी देखील मी पूर्ण ताकतीनिशी लढलो.मात्र,दगा फटका झाल्याने मला पराभवाला सामोरे जावे लागले.पक्षावर व नेतृत्वावर श्रद्धा व निष्ठा असेल तसेच आपले काम आणि मन प्रामाणिक असेल तर आपल्या कामाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते हे मला नेतृत्वाने सभापती करून दाखवले.
सोलापूर, पुणे जिल्ह्याला चार मंत्री पदे दिल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याला देखील अधिक मंत्रिपदे मिळायला हवी होती.यात प्रामुख्याने सलग तीन वेळा भाजप कडून निवडून आलेल्या आमदार राजळे यांना देखील पक्षाने मंत्रीपद द्यायला हवे होते.असे सांगत त्यांनी ना. विखे यांच्याकडे कटाक्ष टाकला तर आमदार राजळे यांच्या पाठीमागे भावा प्रमाणे आपण खंबीरपणे उभे आहोत.मतदार संघाच्या विकास कामासाठी कधीही आवाज द्या, माझ्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन देखील या वेळी सभापती शिदे यांनी दिले.
स्व. बाळासाहेब विखे व गणपतराव देशमुख यांनी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पाच वर्षात ५० हजार कोटी रुपये, या योजनेवर खर्च करण्यात येणार आहेत. पावसाचा पडणारा थेंब आणि थेंब आडवण्यात येणार आहे.
पुढील काळात सर्व पाणी योजना या बंदिस्त पाईपलाईनद्वारे राबवण्यात येणार आहे. यामुळे ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होते. दुष्काळई भागाला शेतीला पाणी कसे देता येईल, यासाठी राज्य सरकार काम करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
आ.मोनिकाताई राजळे यांनी मागणी केलेल्या वांबोरी चारी टप्पा १ दुरुस्तीसाठी १४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मी पुढील आठवड्याच्या बैठकीत मंजुरी देणार असल्याचे ना.विखे यांनी घोषित केले.तसेच एमआयडीसीच्या मागणीवर पाथर्डी शेवगाव मतदार संघातून जाणाऱ्या पुणे संभाजीनगर या महामार्गालगत औद्योगिक वसाहत होण्यासाठी आपण सर्व सहकार्य करू,असे आश्वासन देखील ना. विखे यांनी या वेळी दिले.