४ फेब्रुवारी २०२५ तासगाव : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे याच्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थितीच आहे.या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवराजने त्याच्या आयुष्यातील २० वर्षे देऊन मेहनत केली,मात्र पंचांच्या पाच सेकंदांच्या चुकीने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.दोन वेळा महाराष्ट्र केसरी असणारा शिवराज तिसऱ्या वेळी जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर तो पोलीस उपअधीक्षक झाला असता.
त्यामुळे रागाच्या भरात त्याने पंचांना लाथ घातली. खरं तर त्याने पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.त्याचबरोबर २०२५ चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदनही केले आहे.
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली.पैलवान शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्या मध्ये अंतिम लढत झाली. दोघेही ताकदीने समान असल्याने लढत रंगतदार झाली.यामध्ये मोहोळ याने विजय संपादन केला.
दरम्यान, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या पैलवान राक्षे याने पंचांना लाथ मारली.त्यांची कॉलर ओढली.यानंतर त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान,या प्रकरणाचे जोरदार पडसाद आता उमटू लागले आहेत.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी यामध्ये उडी घेतली आहे.याबाबत सविस्तरपणे बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, पैलवान शिवराजवर अन्याय झाला ही वस्तुस्थिती आहे. व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की, दोन्ही भुजा मॅटला लागाव्या लागतात, पण त्या लागल्या नाहीत.
आता पैलवान मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यात बदल होणार नाही. या पंचांनी शिवराजचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.शिवराज गरीब घरातील पोरगा आहे.त्याचे करियर त्या पंचांच्या एका चुकीच्या निर्णयाने संपले.
अनेकांनी माझ्या या भूमिकेवर आक्षेप घेतला, परंतु माझ्यावरही अशीच वेळ आली होती. मीही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो असतो तर डीवायएसपी झालो असतो.माझ्या विरोधातही असे षडयंत्र रचले गेले.त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता.
त्यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या शिवराजने खरे तर त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे होत्या,या मताशी मी ठाम आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली.त्याचबरोबर पैलवान राक्षेवर घातलेली बंदी ही अन्यायकारक असून त्याच्यावरील बंदी उठवावी,अशी मागणी चंद्रहार पाटील यांनी यावेळी केली.