दुहेरी खून सत्राने शिर्डी हादरली ; साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या

Published on -

४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शिर्डीत एकाच रात्रीत हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा खून झाला,तर शहरातील एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे.जखमीवर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या प्रकारामुळे शिर्डी हादरून गेली असून संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी काही तासातच एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले,तर दुसरा आरोपीही लवकरच जेरबंद केला जाईल, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

सोमवारी पहाटेच्या सुमारास शिर्डीमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या तसेच ड्युटीवरून सुट्टी झाल्याने घरी जाणाऱ्या साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून आरोपींनी चाकूने सपासप वार केले.यात दोघांचा मृत्यू झाला.तिसऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला चढवला मात्र या झटापटीत कृष्णा देहरकर हे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मयत सुभाष साहेबराव घोडे यांच्यावर शिर्डी शहरातील करडोबा नगर चौफुलीजवळ, तर नितीन कृष्णा शेजूळ यांच्यावर राहाता-शिर्डी शिवेवरील रस्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.

वेळेवर तिथे कोणीही न पोहोचल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.शिर्डीतील कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर परिसरात हल्ला करण्यात आला.या घटनेची माहिती वाऱ्या सारखी शिर्डीत पसरल्याने एकच खळबळ उडाली.या हत्याकांडाने शिर्डी शहर हादरून गेले असून साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच डॉ. विखे-पाटील, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबा हॉस्पिटलमध्ये येऊन मयतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डीत येऊन आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.त्याची कसून चौकशी सुरू आहे.पोलिसांनी घटनेचे दखल वेळीच न घेतल्याने मृतांचे नातेवाईक व शिर्डीतील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धती विरोधात संताप व्यक्त केला.

माजी खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली व घटनेची दखल न घेणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

शिर्डी पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला व इतर अधिकाऱ्यांच्या सोबत माजी खासदार डॉ. विखे-पाटील यांनी बैठक घेऊन शिर्डीतील गुन्हेगारीला चाप लावण्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची व भूमिका घेण्याची पोलिसांकडे मागणी केली.

पोलिसांचा धाक राहिला नाही

या घटनेमुळे शिर्डीत अनेकांनी हळहळ व्यक्त करत हॉस्पिटलकडे धाव घेतली. शिर्डी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून शिर्डीत अनेक गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. रोज हाणामाऱ्या, चोऱ्या, हत्येचा प्रयत्न, लूटमार हे प्रकार घडत आहेत. शिर्डीत पोलिसांचा धाक शिल्लक राहिला नाही, अशा तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटल्या आहेत.

जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक ८ तारखेला शिर्डीत घेतली जाणार असून शिर्डी शहर गुन्हेगारी मुक्त करण्याच्या दृष्टीने आपण पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले असल्याचे यावेळी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe