Ahilyanagar News : हिंदुत्वाच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर नामांतराला विरोध करणाऱ्यांना ‘जिहादी’ संबोधले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेविरोधात सरकारतर्फे सक्षम भूमिका मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने योग्य बाजू मांडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जतमधील सिद्धटेक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात आयोजित सकल हिंदू मोर्चात सहभागी होत त्यांनी अतिक्रमणावर कारवाई केली. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत झालेल्या नवसंकल्प शिबिरात त्यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांनी शिर्डीच्या श्रीसाईबाबा संस्थान मंदिराच्या परिसरातील एका धार्मिक स्थळाच्या उत्पन्न संस्थानकडे जमा करण्याची मागणी केली. सध्या हे उत्पन्न खासगी व्यक्तींकडे जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोण दाखल करत आहे याचिका ?
लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी अहिल्यानगर नामांतराला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पहिली सुनावणी 25 जुलै 2024 रोजी झाली. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नामांतराची घोषणा केली होती.
नामांतरास विरोध का?
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर नामांतराविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर आक्रमक होत आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाने सक्षमपणे उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने नामांतर केल्यानंतरही विरोध होत आहे, हे समजण्यासारखे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाचा इशारा
आमदार संग्राम जगताप म्हणाले, “अहिल्यानगर नामांतराला सकल हिंदू समाजाचा पाठिंबा आहे. स्थानिक जनतेच्या भावना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने अहिल्यानगर नाव कायम ठेवण्यासाठी न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी.” त्यांनी काही ‘जिहादी’ प्रवृत्तीच्या लोकांकडून या नामांतराला विरोध होत असल्याचा आरोप करत, “जर या लोकांनी विरोध सुरूच ठेवला, तर त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू,” असा इशाराही दिला.