अपघात टाळण्यासाठी लढणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघाती मृत्यू पांढरीपूल येथील घटना; ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात

Mahesh Waghmare
Published:

जेऊर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. ५) रोजी पहाटे घडली. पांढरीपूल घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे

अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे (क्र. एम.एच. ४१ जी. ७०१७) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली. हॉटेल मातोश्री व हॉटेल राधेश्याम भेळ सेंटर, या दोन्ही हॉटेलमध्ये ट्रक घसल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले तर हॉटेल राधेश्यामचे मालक बंडू गणपत भवार (वय ५० रा. पांढरीपूल, वांजोळी, ता. नेवासा) यांचा अपघातात मृत्यू झाला.

बंडू भवार आपल्या हॉटेलमध्ये आवराआवरी करत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रक अंगावर आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने हॉटेल मातोश्रीपासून तीन मोटारसायकल फरफटात नेत हॉटेल राधेशामच्या भिंतीला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकींचेदेखील नुकसान झाले. घटनास्थळी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी कर्मचाऱ्यांसह भेट दिली.

पांढरीपूल, पांगरमल, खोसपुरी, वांजोळी येथील ग्रामस्थांकडून पांढरीपूल परिसरात होणाऱ्या अपघातांची मालिका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची वारंवार मांगणी करण्यात येत होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात असल्याचा आरोप या वेळी नागरिकांकडून करण्यात आला. नागरिकांचा संताप अनावर झाला होता. काही ग्रामस्थांनी तर मयत भवार यांच्यावरील अंत्यसंस्कार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्याची भूमिका घेतली, त्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त बनले होते.

मयत भवार हे पांढरीपूल परिसरातील होणारे अपघात टाळण्यासाठी करण्यात आलेले विविध आंदोलने, निवेदन तसेच विविध मार्गांनी पाठपुरावा करण्यात नेहमीच सक्रिय असत. अपघाताबाबत सोनई पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. मयत बंडू भवार यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पांढरीपूल येथील अपघातांची मालिका टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा तीव आंदोलनाचा इशारा भाजप तालुका उपाध्यक्ष सोमनाथ हारेर, आदिनाथ काळे, बद्रीनाथ खंडागळे, दत्तात्रय भवार, ज्ञानेश्वर भवार, अमोल भवार, भिमराव आव्हाड, आसाराम महाराज वाघमोडे, बाबाभाई शेख, अविनाश आव्हाड, कय्युम शेख, मुबारक पठाण, रावसाहेब काळे, अप्पासाहेब खंडागळे, बाळासाहेब भवार, रावसाहेब भवार, रशीद शेख, निलेश आव्हाड, सुनील वाघ यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe