राहुरी : मोटारसायकल, गाड्यांचे टायर आणि हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिलांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली असून, सुमारे ४.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीच्या म्होरक्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून जबरदस्तीने चोरीस भाग पाडल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दि. २५ जानेवारी २०२५ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, राहुरी फॅक्टरी परिसरातील काही महिला व त्यांच्या साथीदारांकडून लहान मुलांचा वापर करून चोऱ्या केल्या जात आहेत. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, १६ वर्षीय मुलाला पळवून आणल्याचेही निष्पन्न झाले, त्यामुळे पोलिसांनी त्याची सुटका करून आईच्या ताब्यात दिले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Sमाधानकारक-पाऊस-झाला.-मान्सून-काळात-काही-ठिकाणी-अतिवृष्टी-देखील-झाली.-13.jpg)
संशयित आरोपींची नावे विक्रांत संजय ससाने (वय २१), व दोन महिला (सर्व रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी) आहेत. या आरोपींना दि. २ आणि ३ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. पोलिसांनी ५ मोटारसायकल, गाड्यांचे टायर, हॉटेलमधील साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा ४ लाख २५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हेडकॉन्स्टेबल संदीप ठाणगे, विजय नवले, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, जयदीप बडे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहेत.