श्रीरामपूर : विविध ठिकाणाहून चोरी केलेले ४४ हजाराचे चार मोबाईल जप्त करून सराईत चोरट्याला येथील शहर पोलिसंनी नुकतेच जेरबंद केले आहे. सदर आरोपींवर यापुर्वी देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो सराईत चोरटा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी नवनाथ माणिक जाधव (रा. गोंधवणी रोड) हे जेवण झाल्यानंतर श्रीरामपूर ते गोंधवणी जाणाऱ्या रोडवरती फेरफेटका मारत असताना पेट्रोल पंपाजवळ आले असता, त्यांच्या पाठीमागुन एका दुचाकीवर अनोळखी इसम आला.
तेव्हा त्याने फिर्यादीच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेवून संजयनगरच्या दिशेन भरधाव वेगात निघून गेला. सदर तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर अनोळखी इसमाचा व मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करुन व गुप्त बातमीदार मार्फत माहिती घेवून सदरचा गुन्हा सराईत आरोपी अरबाज आयुब पठाण (वय २४, रा. हुसेननगर, वार्ड नं. १) याने केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा शोध घेतला. तेव्हा आरोपीच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक तत्काळ त्याच्या राहत्या घरी गेले असता सदरचा आरोपी तपास पथकास पाहुन पळुन जावू लागला.
तेव्हा तपास पथकाने त्यास जागीच पकडुन त्याच्याकडे सदर गुन्हयातील चोरी केलेला मोबाईलबाबत चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद तात्काळ अटक करण्यात आली. अटक कालावधीत त्याच्याकडे सखोल तपास केला असता, त्याच्याकडुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरी केलेले खालील वर्णानाचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी
डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस नाईक शरद अहिरे, पोलीस शिपाई संभाजी खरात, पोलीस शिपाई अमोल पडोळे, पोलीस शिपाई मच्छिद्र कातखडे, पोलीस शिपाई अजित पटारे, पोलीस शिपाई अमोल गायकवाड, पोलीस शिपाई आजिनाथ आंधळे, पोलीस शिपाई सागर बनसोडे, महिला पोलीस शिपाई मिरा सरग यांनी केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहे.