शिर्डी साई संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेत झाला ‘असा’ बदल

Sushant Kulkarni
Published:

७ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात मोफत भोजन घेण्यासाठी आता दर्शन घेतल्यानंतरच टोकन मिळणार आहे. मंदिराच्या उदी-प्रसाद काउंटरजवळ भाविकांना हे टोकन दिले जाणार असून, या व्यवस्थेसह काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना गाडीलकर यांनी सांगितले, की ही सुविधा केवळ साईभक्त आणि संस्थान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच उपलब्ध असेल. इतर नागरिकांना प्रसादालयात भोजनासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.गुरुवार, ६ फेब्रुवारीपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होईल.

भाविकांना अधिक सुलभ आणि सुरक्षित भोजनव्यवस्था मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गाडीलकर यांनी सांगितले.शिर्डीत व्यसनाधीन गुन्हेगार आणि भिक्षेकऱ्यांची संख्या वाढल्याने मोफत भोजन व्यवस्थेत बदल करावा,अशी मागणी काही दिवसांपूर्वी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती.

त्यानुसार प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्याचे भाविकांनी सांगितले.सध्या रोज सुमारे ४५ हजार भाविक मोफत भोजनाचा लाभ घेतात.नवीन बदलामुळे प्रसाद भोजन व्यवस्था अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित होईल,असा विश्वास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केला.

गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्णय

संस्थानकडे आलेल्या तक्रारीनुसार, काही लोक मद्यपान करून प्रसादालयात येतात तसेच परिसरात धूम्रपान करतात, त्यामुळे साईभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत नवीन भोजन व्यवस्था लागू केली आहे.

नवीन मोफत भोजन व्यवस्था

– दर्शन घेतलेल्या भाविकांना उदी-प्रसाद काउंटरजवळ टोकन दिले जाईल.
– मुखदर्शन घेतलेल्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक टोकन दिले जाईल.
– संस्थान निवासस्थानातील भाविकांना त्यांच्या रूमच्या पावती व चावीच्या आधारे भोजन कक्षात प्रवेश मिळेल.
– रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केसपेपर किंवा अॅडमिट कार्ड दाखवून भोजन मिळेल.
– पालखी पदयात्री व शालेय सहलींसाठी संस्थान अधीक्षकाच्या खातरजमीनंतर प्रवेश दिला जाईल.
– सशुल्क भोजन सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
– सकाळच्या वेळी दर्शनरांगेत नाश्त्यासाठी वेगळे कूपन दिले जाईल,ज्यासाठी पैसे भरावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe