७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सारोळा कासारच्या बारेमळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी एक मादी बिबट्या व त्याचा अंदाजे तीन महिन्यांचा बछडा दिसून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.
बारेमळा परिसरात अनेक शेतकऱ्यांना गेल्या दोन तीन दिवसांत बिबट्या दिसला होता. त्यामुळे गुरुवारी (दि.६ फेब्रुवारी) वन विभागाला कळविण्यात आले. वन कर्मचारी काही शेतकऱ्यांच्या समवेत बिबट्याच्या पावलांच्या ठशांचा शोध घेत असताना तेथे एका शेतात अंदाजे तीन महिन्यांचा बछडा व त्यापासून काही अंतरावर झुडपात मादी बिबट्या त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढत परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले.
तसेच खबरदारी म्हणून बारेमळा ते खडकी जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.वन कर्मचाऱ्यांनी ही बाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक मानसिंग इंगळे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा शोध सुरु केला.परिसरात सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात गहू, मका अशी पिके असल्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र त्यांना बिबट्या सापडला नाही.या परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कारण बिबट्यासोबत त्याचा बछडा असल्याने तो आक्रमक होत मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.