७ फेब्रुवारी २०२५ पारनेर : पारनेर येथे उभारण्यात येणाऱ्या बसस्थानकाच्या इमारतीसाठी नवीन महायुती सरकारने निधी उपलब्ध केला केला असताना खासदारांचा या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
कळमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पारनेर बसस्थानकात आता नवीन सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आ. काशिनाथ दाते यांनी केली होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आ. दाते यांच्या मागणीची दखल घेऊन पारनेर बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देउन राज्य परिवहन महामंडळाकडून ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.पारनेर बसस्थानक इमारत बांधकाम भूमिपूजनाचा महाविकास आघाडीच्या खासदार यांनी घाट घातला असून, या इमारत भूमिपूजनाचा अधिकार खासदारांना नाही.
ज्या कामांशी काडीमात्र संबंध नाही, अशा कामांचे श्रेय घेण्याचा खासदारांचा सुरू असलेला प्रयत्न लाजिरवाणा आहे. त्यांच्याकडून असा पोरकटपणा कायम केला जातो, हे गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघातील जनता पाहत आहे.
केंद्रातील व राज्यातील महायुतीचे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढायचे स्वतःचे कौतुक करून घ्यायचे आणि मी कसा पाठपुरावा केला, हे सोशल मीडियातून दाखवायची पद्धत पारनेर नगर मतदारसंघातील जनतेच्या आता लक्षात आली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता केला आहे.