महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत १ गोडाऊन, ९ गाळे, ९ नळ कनेक्शन तोडले

Sushant Kulkarni
Published:

अहिल्यानगर – शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देऊनही थकबाकीदार कर भरत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या सुमारे २२ लाखांच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेने आठ मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ गोडाऊन व ९ गाळे सील करत ९ नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे.

प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक ५३ मधील मालमत्ताधारक बबन लक्ष्मण फाटके यांच्याकडे मालमत्ताकराची ४ लाख ८६ हजार १२ रुपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक ४३ मधील मालमत्ताधारक फकीर मोहम्मद नूर मोहम्मद बागवान यांच्याकडे मालमत्ताकराची ३ लाख ३५ हजार ५०२ रुपये थकबाकी असल्याने त्यांचे कमर्शियल चार गाळे सील करण्यात आले.

तसेच ४ नळ कनेक्शन बंद करण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक ४३ मधील मालमत्ताधारक देवकर यांच्याकडे मालमत्ता कराची १ लाख ६० हजार ६५४ रुपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक ५४ मधील मालमत्ताधारक याकूब साळवे भोग – कुमार वाघ यांच्याकडे मालमत्ता कराची १ लाख १६ हजार ७८९ रुपये थकबाकी असल्याने त्यांचा कमर्शियल गाळा सिल करण्यात आला.

तसेच, प्रभाग समिती क्रमांक ३ वार्ड क्रमांक ४ मधील सुशिलाबाई राजाराम पाथरकर यांच्याकडे ७९ हजार ५७५ रुपये थकबाकी असल्याने त्यांचे ४ गाळे सील करण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक २ वार्ड क्रमांक १७ मधील मालमत्ताधारक रखमाबाई यादवराव ठोंबरे यांच्या थकबाकीपोटी नळ कनेक्शन बंद करण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक ४ वार्ड क्रमांक ३० मध्ये ७४ हजार रुपये थकबाकी असल्याने नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक ४३ मधील मालमत्ता धारक मोहम्मद उस्मान महमूद मोहम्मद चमडेवाले यांच्याकडे मालमत्ता कराची ९ लाख ५७ हजार ८९४ रुपये थकबाकी आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी गोडाऊन मधील भाडेकर्‍यास चमडे काढून घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने चमड्यासकट गोडाऊन सील करण्यात आले.

महानगरपालिकेने शास्ती मध्ये १०० टक्के सवलत दिली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही मुदत आहे. कोणत्याही परिस्थितीत जप्ती कारवाई थांबणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांनी तत्काळ सवलत घेऊन थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा जप्ती कारवाई केली जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe