Zero Tax Nations:- जगात असे अनेक देश आहेत जिथे नागरिक आणि कंपन्यांकडून एक पैसाही वैयक्तिक आयकर घेतला जात नाही.भारतासारख्या देशांमध्ये जिथे 30% पर्यंत आयकर भरावा लागतो. तिथे या देशांचे धोरण करदात्यांसाठी खूपच आकर्षक वाटू शकते. मात्र हे देश कमी लोकसंख्या, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर अवलंबून असतात. चला तर मग मंडळी पाहूया कोणते देश “झिरो इन्कम टॅक्स नेशन्स” म्हणून ओळखले जातात.
झिरो इन्कम टॅक्स नेशन्स कोणते?
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-23.jpg)
वनुआटू
हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक छोटा देश आहे. येथे कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक आणि कॉर्पोरेट आयकर नाही. एवढेच नव्हे तर या देशातील कंपन्यांना तब्बल 20 वर्षांसाठी करसवलत दिली जाते. मात्र सरकार उत्पन्नासाठी इतर पर्यायांचा अवलंब करते. येथे कंपन्यांकडून केवळ 300 अमेरिकी डॉलर्स (सुमारे 26,000 रुपये) वार्षिक फी आकारली जाते.
केमॅन बेटे
उत्तर अमेरिकेच्या कॅरिबियन भागातील हा बेटांचा देश म्हणजे करसवलतीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे वैयक्तिक आणि कॉर्पोरेट कर नसला तरी 7.5% स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. अनेक मोठ्या वित्तीय कंपन्या आणि हेज फंड्स येथे नोंदणी करतात. मात्र गुंतवणूकदारांना सहज नागरिकत्व मिळत नाही.
बर्म्युडा
बर्म्युडा हा अटलांटिक महासागरातील ब्रिटिश अधिपत्याखालील एक बेट देश आहे. येथे आयकर घेतला जात नाही. त्यामुळे हा देश श्रीमंत लोकांसाठी नंदनवन आहे. मात्र येथे राहण्यासाठी थेट नागरिकत्व मिळत नाही. परंतु 2.5 मिलियन अमेरिकी डॉलर्स (सुमारे 20 कोटी रुपये) गुंतवणूक करून राहण्याची परवानगी मिळवता येते.
बहामा
कॅरिबियन बेटांमध्ये वसलेला हा देश पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा यावर अवलंबून आहे. येथे वैयक्तिक कर नाही आणि कॉर्पोरेट टॅक्स फक्त 3% आहे. मात्र संपत्तीवरील कर 0.75% ते 2% दरम्यान आहे.त्यामुळे मालमत्ता मालकांना काही प्रमाणात कर भरावा लागतो.
संयुक्त अरब अमिराती (UAE)
UAE हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असून येथे व्यक्तींना कोणताही आयकर भरावा लागत नाही. कॅपिटल गेन्स, वारसा कर, भेटीवरील कर आणि संपत्तीवरील कर देखील आकारले जात नाहीत. मात्र 375,000 दिऱ्हाम्सपेक्षा (सुमारे 84 लाख रुपये) अधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांवर 9% कॉर्पोरेट कर आकारला जातो. तरीही हा करदर जगातील सर्वात कमी करांपैकी एक आहे.
बहरिन
हा मध्यपूर्वेतील एक छोटा देश आहे.जिथे व्यक्तींवर कोणताही आयकर नाही. मात्र इंधन उद्योगाशी संबंधित कंपन्यांवर 46% कॉर्पोरेट कर आहे. येथे व्हॅटचा दर 10% आहे आणि स्टॅम्प ड्युटी 1.7% ते 2% पर्यंत असते.
सेंट किट्स आणि नेविस
हा छोटासा कॅरिबियन देश नागरिकत्वासाठी गुंतवणुकीचा पर्याय देतो. येथे आयकर, डिव्हिडंडवरील कर, रॉयल्टी किंवा व्याजावर कर नाही. मात्र कॉर्पोरेट कर 33% आहे.व्हॅट 10-15% आहे आणि संपत्तीच्या मालकीवर 0.2-0.3% कर आकारला जातो.
अँटिग्वा आणि बार्बुडा
हा आणखी एक कॅरिबियन देश आहे जिथे आयकर, कॅपिटल गेन्स कर, वारसा कर किंवा संपत्तीवरील कर आकारला जात नाही. येथील कंपन्यांना नोंदणी केल्यानंतर 50 वर्षांपर्यंत कोणताही कर भरावा लागत नाही. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय आहे.
शेवटी महत्वाचे
या देशांमध्ये आयकर नसला तरी ते त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी इतर करांवर अवलंबून असतात.जसे की मालमत्ता कर, व्हॅट, स्टॅम्प ड्युटी किंवा कंपन्यांसाठी काही विशिष्ट कर. तसेच बहुतेक देशांमध्ये नागरिकत्व किंवा दीर्घकाळ राहण्याची प्रक्रिया सोपी नसते. त्यामुळे अशा करमुक्त देशांमध्ये राहण्याच्या किंवा गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्यांनी सर्व अटी आणि शर्ती नीट समजून घेतल्या पाहिजेत