विरोधात फिर्याद दिल्याचा राग डोक्यात शिरला अन् त्याने सेवेकऱ्याचे शीर धडावेगळे केले

Mahesh Waghmare
Published:

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ भानुदास घोरतळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३० जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या मालकीच्या विहिरीत एक मुंडके तरंगताना दिसले. सदर मुंडके नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दहातोंडे व फिर्यादी एकनाथ भानुदास घोरतळे यांनी पाहुन ते सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांचे असल्याचे ओळखले होते.

त्यानंतर दि. ३१ जानेवारी रोजी यातील मयताचे धड / शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरलेले स्थितीत मिळुन आले सदरचे धड हे मयताचे नातेवाईकांनी पाहुन ते नामदेव रामा दहातोंडे यांचे असल्याचे ओळखल्याने गौतम नामदेव दहातोंडे याच्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर या भागात वेगवेगळी दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती दरम्यान तपास चालु असताना कैलास सुंदर काशिद (रा.एकबुर्जी वस्ती बोधेगाव ता. शेवगाव) याने मागील वर्षी पहिलवान बाबा मुर्तीची विटंबना केली होती. या कारणावरून त्याच्या विरोधात सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे याने त्याचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

मात्र त्याचा रोष मनात ठेवुन दि.२६ रोजी पहाटे त्यांची हत्या करुन मुंडके पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागील विहीरीमध्ये टाकुन धड दोनशे मिटर अंतरावर असलेल्या एका कोरड्या विहिरीमध्ये पुरुन टाकले होते. याप्रकरणी पोलिसांनी कैलास सुंदर काशिद रा.एकबुर्जी वस्ती बोधेगाव ता. शेवगाव यास अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe