अहिल्यानगर : विश्वास ठेवतो तोच घात करतो, ही बाब खरी ठरली आहे. एका मित्राने मित्राचीच तब्बल २२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्वास संपादन करून २२ लाख रुपये उसने घेतले व बाहेरगाव जाण्यासाठी कारही घेतली. मात्र रक्कम व कार परत न केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कृतार्थ किशोर गुणवरे (वय १९, रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुणवरे याचा मित्र स्वप्नील विजय खाडे (रा. भिस्तबाग चौक, अ.नगर) याने पैशाची गरज आहे, असे सांगून जुलै २०२४ पासून ते २० जानेवारी २०२५ दरम्यान कृतार्थ यांच्याकडून आणि त्याचे आजोबांच्या अकाउंटवरून ऑनलाईन, असे हातउसने २२ लाख रुपये घेतले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Sमाधानकारक-पाऊस-झाला.-मान्सून-काळात-काही-ठिकाणी-अतिवृष्टी-देखील-झाली.-3-1.jpg)
तसेच २२ जानेवारी रोजी स्वप्निल याने मला बाहेरगावी जावून पैसे घेऊन यायचे आहे. त्याकरिता तुझी कार दे, दोन दिवसाने परत आलो की, तुझे घेतलेले २२ लाख रुपये व कार परत देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. तो कृतार्थ गुणवरे याची कार (क्र. एम एच १६ सीई ५०५५) घेऊन गेला, तो अद्याप परतला नाही.
त्यानंतर २८ जानेवारी रोजी कृतार्थ हा त्याच्या मित्रांसह स्वप्निल खाडे यांच्या घरी कार व पैसे मागण्याकरता गेला असता स्वप्नील खाडे याने त्यांना शिवीगाळ करून गाडी परत मागण्याकरता आल्यास हात पाय तोडून घरी पाठवीन, अशी धमकी दिली. त्यामुळे कृतार्थ गुणवरे याने स्वप्निल खाडे यांच्याविरुद्ध धमकी दिल्याची तक्रार दिली होती.
त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. परंतु अद्यापही राहुल खाडे याने पैसे व कार माघारी न दिल्याने कृतार्थ गुणवरे यांनी ६ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल खाडे यांच्याविरुद्ध विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.