अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करीत पहिलवानाने पंचांची कॉलर पकडून लाथ मारली होती. यानंतर महाराष्ट्रात मला ट्रोल केले जात असून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पंच नितीश काबलिये (रा.छत्रपती संभाजीनगर) यांनी बेगमपुरा पोलिसांकडे शुक्रवारी (दि. ७) पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. डबल केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य सामना झाला.
अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणी मोहोळने राक्षेला पाठीवर आणले. त्यानंतर पंचांनी मोहोळला विजयी घोषित केले. तेव्हा राक्षे प्रचंड संतापला. पाठ पूर्णपणे टेकलेली नसतानाही पंचांनी मला पराभूत ठरवल्याचा आरोप त्याने केला. तसेच, त्याची फेरअपील मागणीही ऐकून घेतली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या राक्षेने हुज्जत घालायला सुरुवात केली. तेवढ्यावरच न थांबता पंचाची कॉलर पकडून लाथ मारली होती.
तेव्हा तेथे मोठा राडा झाला होता. या प्रकरणाच्या सविस्तर बातम्या विविध वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियात चर्चेत आल्या होत्या. महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी पंचांना दोषी ठरविले. त्यात चंद्रहार पाटील यांनी त्या पंचांना लाथ नव्हे गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे मत मांडले. त्यावरूनही बराच गोंधळ झाला.
या सर्व पार्श्वभूमीवर पंचांना स्वत:च्या जीवाला धोका वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन संरक्षण मिळावे, असे पत्र दिले. आपल्याकडे पत्र आले आहे, मात्र अद्याप संरक्षण देण्याबाबत निर्णय झालेला नाही. वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले.