लोणावळ्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या ; पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात होते कार्यरत

Mahesh Waghmare
Published:

कामशेत : पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्याजवळील टायगर पॉइंट जवळ असलेल्या शिवलिंग पॉइंट येथे झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर पॉइंट जवळ असलेला शिवलिंग पॉइंट या ठिकाणी एका इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती ११२ वर फोन करून दिली.

यानंतर स्थानिक शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली.या ठिकाणी असलेल्या क्रेटा गाडीचा (एमएच-१७ सीएम ९६९७) नंबर तपासला असता तो खडगाव, संगमनेर येथील असल्याचे आढळून आले.स्थानिक खडगाव संगमनेर येथील पोलीस पाटलांकडे यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी ही गाडी पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांची असून ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्यात यासंदर्भात चौकशी केली असता गुंजाळ हे मागील तीन दिवसांपासून ड्युटीवर गैरहजर होते.त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन दिवस त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला,मात्र फोन लागला नाही.त्यांच्याशी काहीही संपर्क होत नसल्याने खडकी पोलीस शुक्रवारी अण्णा गुंजाळ यांच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार दाखल करणार होते.याप्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe